सावली येथे नवीन बसस्थानकाचे लोकार्पण पार पडले. या बस स्थानकासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले

सावली येथे नवीन बसस्थानकाचे लोकार्पण आज पार पडले. या बस स्थानकासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. सुरुवातीला ही जागा जलसंपदा विभागाची होती. ती बस स्थानकासाठी हस्तांतरीत करण्यात आली. या शहरात सुंदर बस स्थानक व्हावे, यासाठी तीन वेळा डिझाईन मध्ये बदल करण्यात आला. बसस्थानक छोटे असले तरी त्यात सर्व सोयीसुविधा असणे आवश्यक आहे. आजूबाजूचे काही बसस्थानक केवळ नावासाठी मोठे असून पाऊस आला तर प्रवाशांना ओले व्हावे लागते. अशी परिस्थिती या बसस्थानकावर येणार नाही, याची काळजी घेतली आहे. येथे सर्व सोयीसुविधा त्वरित उपलब्ध करून देऊ. येथील संरक्षण भिंत, काँक्रिटचे रस्ते आदींसाठी अतिरिक्त दीड कोटीचा निधी देण्यात येईल. 2 कोटी 64 लाख रुपये खर्च करून हे बसस्थानक उभे झाले आहे. सावली येथील नवीन बसस्थानक हे शहर व तालुक्याच्या दृष्टीने विकासाच्या बाबतीत एक मानाचा तुरा आहे.
कोरोनाच्या काळात एसटीचा प्रवास अतिशय खडतर झाला. एक वेळ तर असे वाटले की, एसटी पुन्हा रस्त्यावर धावते की नाही. मात्र राज्य शासनाने अतिरिक्त दीड हजार कोटीची आर्थिक मदत उपलब्ध करून दिल्याने एसटी पुन्हा रस्त्यावर धावू लागली. ग्रामीण व सर्वसामान्य लोकांसाठी एसटी ही एक प्रकारची जीवनवाहिनी आहे.
इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना जास्त वेतन देण्यात येते. मागच्या काळात एसटीचा संप काही लोकांच्या भडकावण्यामुळे झाला. यात मोठ्या प्रमाणात एसटीचे व कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले. मात्र राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना मदतीचा हात दिला आणि पुढेही कर्मचा-यांच्या पाठीशी सरकार आहे. बसस्टँडच्या मागे असलेल्या खुल्या जागेत अडीच कोटी रुपये खर्च करून महात्मा फुले उद्यान बनविण्यात येईल. विकास व सौंदर्यीकरणाच्या बाबतीत सावली आता बदलत आहे.
उद्घाटनाला नगराध्यक्ष लताताई लाकडे उपप्रादेशिक परिवहन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक शिवाजी जगताप, गडचिरोलीचे विभाग नियंत्रक अशोक वाडीभस्मे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, अधिवक्ता रामभाऊ मेश्राम, विजय कोरेवार, विलास विकार नगरपंचायतचे उपाध्यक्ष संदीप पुण्यपवार चंद्रपूरच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे कार्यकारी, अभियंता नरेंद्र खांडेकर आदी उपस्थित होते.
/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on सावली येथे नवीन बसस्थानकाचे लोकार्पण पार पडले. या बस स्थानकासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले