कोरोना रुग्णांकरीता उपलब्ध असलेल्या बेड ची माहिती मिळण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने बेड मॅनेजमेंट पोर्टल सुरू केले आहे .

रुग्ण जवळच्या कोवीड केअर सेंटर किंवा कोविड रुग्णालयात गेल्यावर तिथे रुग्णांचे ऑक्सिजन लेवल व इतर बाबींची तपासणी करून रुग्णाची नोंदणी सदर पोर्टलवर अपलोड करतील. रुग्णाची गंभीर स्थिती पाहून केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार रुग्णाला चंद्रपूर शहरातील आवश्यक सुविधा युक्त हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होईल व त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू होईल.
या पोर्टल च्या माध्यमातून कोविड रुग्णांना चंद्रपूर शहरातील सर्व कोवीड रुग्णालयात आय.सी.यु., व्हेंटिलेशन व ऑक्सिजन बेड च्या तीन स्वतंत्र प्रतीक्षा यादी नुसार बेड उपलब्ध होतील. सोमवार पासून शहरातील कोणतेही कोवीड हॉस्पिटल रुग्णांना परस्पर दाखल करून घेणार नाही. तसेच उपलब्ध रिक्त बेडची माहिती जिल्हा नियंत्रण कक्ष व कोवीड केअर सेंटरला लगेच उपलब्ध होईल, बेड रिक्त झाल्यावर संबंधित रुग्णालय तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष रुग्णाला माहिती देतील. या प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण थेट जाऊन उपचार घेतील. यामुळे प्रतीक्षा यादीतील गरजू रुग्णाला तात्काळ बेड उपलब्ध होईल. बेड उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांची इकडे तिकडे बेड शोधण्यासाठी फरपट होणार नाही हॉस्पिटल ला देखील बेड रिक्त नसल्याची सबब यामुळे आता सांगता येणार नाही. चंद्रपूर शहराच्या बाहेरचे हॉस्पिटलचा समावेश या पोर्टलमध्ये करण्यात आलेला नाही. या पोर्टलमध्ये हॉस्पिटल ला दिल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची माहिती सुद्धा उपलब्ध असणार आहे. तर पोर्टलच्या पहिल्या पानावर कोविड हॉस्पिटल, डॉक्टर व त्यांचे नोडल अधिकारी यांची माहिती व मोबाईल क्रमांक उपलब्ध असणार आहे.
सदर पोर्टलवर नोंदणी केलेल्या रुग्णांची बेड निहाय प्रतीक्षा यादी तयार होईल त्यांची प्रतीक्षायादी बघण्यास उपलब्ध राहणार आहे. नोंदणीनंतर प्रत्येक रुग्णांना एक टोकन नंबर देण्यात येणार असून रुग्णांनी तो जपून ठेवावा पुढील उपचारासाठी त्याला तो गरजेचा राहील.
यामध्ये प्रत्येक रुग्णाला त्याच्या आवश्यकतेप्रमाणे हॉस्पिटल व बेड उपलब्ध होऊ शकेल. नोंदणी करताना रुग्णाचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, रुग्णाच्या शरीरातील ऑक्सीजन पातळी, आरटीपिसीआर तपासणी अहवाल आवश्यक आहे. तसेच नोंदणी करताना एका मोबाइल क्रमांकावरून चार रुग्णांची नोंदणी करता येऊ शकेल, जेणेकरून कोणाजवळ मोबाईल नसल्यास त्यांना इतरांच्या मोबाईल वरून देखील नोंदणी करता येणे शक्य होईल
/ In कोरोना_योद्धा / By admin / Comments Off on कोरोना रुग्णांकरीता उपलब्ध असलेल्या बेड ची माहिती मिळण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने बेड मॅनेजमेंट पोर्टल सुरू केले आहे .