सतत घेतला जनतेच्या अडचणींत धावून जाण्याचा ध्यास, अन् कमावला विश्‍वास

           सरकारनामा पोर्टल वर ना. विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भात प्रसिद्ध झालेला लेख 

राजकारण कळंतही नव्हतं तेव्हापासून लोकांच्या अडचणींमध्ये मदतीला धावून जाण्याचा स्वभाव सुरुवातीपासून अंगी होता. वयानुसार तो वृद्धिगंत होत गेला. सुरुवातीला गावात लोकांची लहान-मोठी कामे करायचो. त्यातून आपण पुढे बरंच काही करू शकतो, हा विश्‍वास बळावला आणि मग गावातून, तालुका आणी तालुकापातळीवरून जिल्हा पातळीवरची कामे करायला लागलो. जीवनातील सुरू झालेल्या या प्रवासात मित्रांची भक्कम साथ होती. त्यातूनच मग मोठा गोतावळा जमा होत गेला आणि समाजसेवा खऱ्या अर्थाने करायची आहे, तर राजकारणाशिवाय ती होणार नाही, हे लक्षात आले. पण कुठलाही हेतू ठेवून राजकारणात आलो नाही, तर ती लोकांसाठी काम करण्याची खुमखुमी होती. आजही मंत्री म्हणून काम करताना मी मंत्री कमी आणि कार्यकर्ता अधिक असतो. माझ्या आणि जनतेच्या मधात मी पदं येऊ दिली नाही. त्यामुळेच लोकांचा विश्‍वास कमावण्यात परमेश्‍वराने यश दिले आणि हीच माझी स्ट्रेंथ आहे.
– विजय वडेट्टीवार
मदत व पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र राज्य.

‘भाऊं’ची दादागिरी
चंद्रपूर आणि गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांतून बेरोजगारी आणि अन्य सामाजिक विषयांवर आंदोलने केली. विजय वडेट्टीवारचे आंदोलन म्हटले की भल्याभल्यांना घाम फुटायचा, थरकाप उडायचा. सर्व आवडीनिवडी, सामाजिक भान जोपासत आदिवासींसाठी आंदोलने केली, संघर्ष केला. त्यादरम्यान मार खाल्ला आणि मारही दिला. त्यामुळे माझा धाक निर्माण झाला होता. मी सिनेमा बघायला गेलो की त्या थियेटरमध्ये कुणी टवाळखोर शिट्टीदेखील वाजवायला घाबरायचा. लोक तेव्हा दादागिरी म्हणायचे. पण ही दादागिरी चांगल्यासाठी होती, लोकांच्या भल्यासाठी होती. ‘दादागिरी’ म्हणणारे हेच लोक नंतर मग सन्मानाने बोलावू लागले आपली चार कामं सांगू लागले. यालाच जर दादागिरी म्हणत असतील, तर होय मी लोकांच्या कल्याणासाठी दादागिरी केली आहे, असेही ‘भाऊ’ नावाने सर्वदूर परिचित असलेले मंत्री विजय वडेट्टीवार ठामपणे सांगतात.

बिहारमध्ये निवडून आणले दोन आमदार
बिहार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेस पक्षाने रोहतास जिल्ह्याची जबाबदारी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर सोपवली होती. त्यातल्या ज्या दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर होती, तेथील कॉंग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. खास वडेट्टीवार स्टाईलने त्यांनी निवडणुकीची व्युव्हरचना आखली होती. आपल्या विशिष्ट स्टाईलने त्यांनी तेथील कार्यकर्त्यांना ‘चार्ज’ केले आणि विजयश्री खेचून आणली. हे यश त्यांनी केवळ पाच दिवसांत मिळवले. बाकी उमेदवारांनी तयारी पूर्ण केली होतीच. पण विजूभाऊंनी पाच दिवस झंझावाती दौरा करून बैठकांचा जो सपाटा लावला. त्याचे यश त्यांना मिळाले. बिहारचा अनुभव त्यांचा खूप चांगला राहिला.
आजारी आणि अपघातग्रस्तांना तातडीची मदत
चंद्रपूर जिल्हा जंगलांनी व्यापलेला आहे. रोज कुठे ना कुठे अपघात होतच असतात. वाघ, बिबट्या, अस्वल आदी वन्य श्‍वापदांच्या हल्ल्यांमध्ये जखमी होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अशी घटना कुठेही घडल्यास मी असो किंवा नसो त्या व्यक्तीपर्यंत मदत पोहोचते, तशी व्यवस्था मतदारसंघात करून ठेवलेली आहे. आमचा प्रत्येक तालुकाध्यक्ष या कामासाठी नेहमी अलर्ट असतो. त्यांच्याकडे दर महिन्याला पैसे, वाहन आदी व्यवस्था करून दिलेली असते. गंभीर आजारी रुग्णांसाठीही अशीच व्यवस्था करून ठेवलेली आहे. हे सर्व करताना संबंधित व्यक्ती खरंच गरजू आहे की नाही, याची खातरजमा मात्र कार्यकर्ते करतात. अशा मदतीसाठी मंत्री वडेट्टीवार आणि त्यांचे कार्यकर्ते सजग असतात.

पत्नीने कधी विरोध केला नाही
सामाजिक जीवनात वावरत असताना लोकांसाठी खूप काही करण्याचा प्रयत्न असतो. जेव्हा मी काहीही नव्हतो, त्या परिस्थितीतही घरी कुणी काही मदत मागायला आले आणि घरात जर ५०० रुपये असतील त्यातले ३०० रुपयेसुद्धा मदत म्हणून दिलेले आहेत. घरची स्थिती फार चांगली नसतानासुद्धा पत्नी किरणने कधीही माझ्या या कार्याला विरोध केला नाही, तर पाठिंबा देऊन माझा उत्साहच वाढवला आहे. माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनात पत्नीने दिलेली भक्कम साथ लाख मोलाची ठरली. मी घरी फार कमी असतो, पण असे असताना मुलांची आणि सर्व आप्तेष्टांची जबाबदारी पत्नी कुशलतेने हाताळते. नातेवाइकांना मदत करायची असो की त्यांच्या शिक्षणाची कामं असो प्रत्येक कार्यात ती हिरिरीने स्वतःला झोकून देते. माझ्या आजवरच्या प्रवासात तिचे योगदान विशेष उल्लेखनीय असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार अभिमानाने सांगतात.

मुलांना आवडते माझ्या हातचे चिकन
राज्यभर कितीही कामं असली तरी आठवड्यातला एक दिवस, शक्यतोवर रविवारी काही वेळ कुटुंबीयांना देण्याचा पूर्ण प्रयत्न असतो. या दिवशी माझा वावर जास्तीत जास्त किचनमध्ये असतो. मुलांना मी बनविलेले चिकन फार आवडते. त्यामुळे रविवारी मी आवडीने चिकन बनवतो. याशिवाय सर्व प्रकारचे नॉनव्हेज मी उत्कृष्ट बनवतो. कुकींगची फार आवड आहे आणि दिवाळीच्या या दिवसांमध्ये पत्नी आणि मुलीला फराळाचे पदार्थ बनवण्यास हातभार लावायलाही मला फार आवडते. त्यामुळे हा एक दिवस घरच्यांसोबत घालवून पुन्हा पुढील आठवडाभर काम करण्याची ऊर्जा घेऊन बाहेर पडतो, असे ते आनंदाने सांगतात.

लावले सात हजार जोडप्यांचे विवाह
सामूहिक विवाह सोहळ्यातून समाजाला चांगला संदेश देण्याचे काम सन २००१ पासून सुरू केले. एक रुपयांत विवाह तेव्हापासून लावत आलो आहे. आजपर्यंत या सोहळ्यांतून सात हजार जोडप्यांचे विवाह केले आहेत. या सोहळ्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतो. यावर्षी कोविडच्या आक्रमणामुळे हे कार्य होऊ शकले नाही. पण आता पुढील वर्षीची तयारी आमची सुरू झाली आहे. पुढील महिन्यापासून नोंदणी सुरू होत आहे. यामध्ये इच्छुक जोडप्यांची कागदपत्र गोळा करण्याचेही काम सुरू आहे. येत्या वर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किमान ५०० जोडप्यांचे विवाह करण्याचे नियोजन आम्ही केले आहे. या उपक्रमातून फालतू खर्चांना फाटा देऊन समाजोपयोगी कामे करण्याचा संदेश दिला जातो. याशिवाय आजपर्यंत ३० हजार लोकांचे डोळे तपासून त्यांना चष्मे दिलेले आहेत. पाच हजारांपेक्षा अधिक शस्त्रक्रिया वडेट्टीवार आणि त्यांच्या टिमने करवून दिल्या आहेत आणि हे काम निरंतर सुरू आहे.

दिवाळी होते आदिवासींसोबत साजरी…
मंत्री विजय वडेट्टीवार आणि त्यांचे कुटुंबीय दरवर्षी दिवाळी आदिवासींच्या गावांमध्ये त्यांच्या पोडांवर जाऊ साजरी करतात. त्यांच्या घरात आनंदाचा दिवा लावल्याशिवाय ते आपल्या घरी दिवा पेटवत नाहीत. हा त्यांचा गेल्या कित्येक वर्षांपासून शिरस्ता आहे. या कामी त्यांची मुलगी शिवाणी आघाडीवर असते. शिवाणीने आजच तीन हजारांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांसाठी कपडे आणि मिठाई अरेंज करून ठेवली आहे. शिवाणी महाराष्ट्र युवक कॉंग्रेसची पदाधिकारीसुद्धा आहे. उद्या सकाळी संपूर्ण वडेट्टीवार कुटुंबीय सकाळीच नागपूरहून ब्रम्हपुरीसाठी निघणार आहेत. आदिवासींच्या गावांमध्ये, पोडांवर जाऊन त्यांच्या घरी आनंदाची उधळण करणार आहेत. दिवसभर विविध गावांत, पोडांवर त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केल्यानंतर सर्व जण सायंकाळी आपल्या घरी येतील आणि त्यानंतर लक्ष्मी पूजनाला पहिला दिवा आपल्या घरी लावतील. हीच आपल्यासाठी खरी दिवाळी आणि मनाचा आनंद असल्याचे मंत्री वडेट्टीवार म्हणाले.

मुंबई आणि नाटक हे समीकरण
मी स्वतः नाट्य कलावंत आहे. आधीपासूनच नाटकांची भारी आवड. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील झाडीपट्टी रंगभूमी गाजवली आहे. ३० पेक्षा जास्त नाटकांमध्ये काम केलेले आहे. `थॅंक यू मिस्टर ग्लॅड’ या नाटकामध्येही काम केलं आहे. ज्युनिअर कॉलेज नाट्य स्पर्धा गाजवल्या आहेत. त्यामध्ये एकपात्री प्रयोग केले. नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयात झालेल्या या स्पर्धांमध्ये पुरस्कारही पटकावले आहे. त्याकाळी जेव्हा केव्हा मुंबईला जाण्याचा योग आला की नाटकं बघितल्याशिवाय परत येत नसे. कित्येकदा तर तीन दिवसांसाठी गेलेलो आम्ही पाच-सहा दिवस होऊनही परत येत नव्हतो, अशी आठवण मंत्रीमहोदयांनी सांगितली.
कोरोना लॉकडाऊनच्या पूर्वी पाहिला होता ‘नाळ’
नाटकांप्रमाणेच सिनेमा बघण्याचीही भरपूर हौस आहे. त्यातल्या त्यात मराठी सिनेमे आवर्जून पाहतो. पण यावर्षी कोरोनाचे लॉकडाऊन आणि त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती, यामुळे सिनेमा बघण्याचा विषयच नाही. परिस्थिती हाताळण्यातच सर्व वेळ आणि शक्ती खर्ची घातली. हो पण कोरोनाचा शिरकाव होण्याआधी कुटुंबीयांसोबत मराठी ‘नाळ’ हा सिनेमा बघितला होता. मुलं तिकीट वगैरे काढून ठेवतात आणि मला त्यांचा आदेश येतो की, आज आपल्याला सिनेमा बघायला जायचे आहे. मलासुद्धा मुळात सिनेमाची आवड असल्यामुळे मी सर्व कामे आटोपून सिनेमाच्या वेळात पोहोचतो आणि सर्व मिळून थियेटरमध्ये सिनेमाचा आनंद घेतो. अशी दिवशी जेवणही बाहेरच घेणे पसंत करतो, असेही ते म्हणाले.

तालुक्याच्या ठिकाणी सुरू केली सीबीएसई शाळा
चंद्रपूरसारख्या जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी सीबीएसई शाळा नव्हती. त्यामुळे ना नफा ना तोटा या तत्वावर सिंदेवाही येथे ‘देवयानी इंटरनॅशनल स्कूल’ सुरू केली. या शाळेमुळे तालुक्यातील सामान्य जनतेचे आपल्या मुलांना सीबीएसई शाळेत शिकवण्याचे स्वप्न साकार होते आहे.

परिचय ः-
विजय वडेट्टीवार यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिंपरी तालुक्यातील करंजी या गावी झाला. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी शेती आणि व्यापारात रुची घेतली. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि तेलगू भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे ते सदस्य असून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी या मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. १९८० ते १९८१ या काळात एनएसयुआयच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीत त्यांनी काम केले. १९९१ ते १९९३ दरम्यान ते गडचिरोली जिल्हा परिषदेचे नामनियुक्त सदस्य होते. १९९६ ते १९९८ मध्ये राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेल्या महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे ते अध्यक्ष होते. १९९८ ते २००४ पर्यंत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. २००४ ते २००९ या काळात ते चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. २००८ ते २००९ जलसंपदा, आदिवासी विकास, पर्यावरण व वने राज्यमंत्री. त्यानंतर २००९ ते २०१४ या कालावधीत ते पुन्हा चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले. २००९ ते २०१० जलसंपदा, ऊर्जा, वित्त व नियोजन, संसदीय कार्य राज्यमंत्री होते. २०१४ ते आजतागायत ते ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. याशिवाय २०१०-२०११ चंद्रपूर जिल्हा सहकारी बॅंकेचे चेअरमन, २००८ ते २०११ महाराष्ट्र राज्य स्टेट कोऑपरेटीव्ह बॅंक मुंबईचे संचालक, २०१४ पासून आजतागायत विधानसभा, विधानमंडळ कॉंग्रेस पक्षाचे उपनेते आहेत. २०१९ ला कॉंग्रेसचे विधानमंडळ आणि विधानसभेचे गटनेते होते. १९९८ ते आजपर्यंत विधिमंडळाच्या विविध समित्यांचे सदस्य आहेत. रुस, लंडन, स्वीस, फ्रान्स, जपान, सिंगापूर आदी देशांमध्ये त्यांनी अभ्यास दौरे केले आहेत.